मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परराज्यातील मजुरांनी स्थलांतर केले आहे. याचा फायदा घेत मुंबईत अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेल्या दुधाच्या दुकानदारांनीही आपल्या गावी जाणे पसंद केले आहे. यामुळे घाटकोपरमधील 18 दुध डेअरीची दुकाने बंद पडली आहेत. असाच प्रकार सुरू राहिल्यास काही दिवसांनी घाटकोपरमधील नागरिकांना दुधाच्या समस्येला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत जागो जागी कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे पैसे नसल्याने होणारी उपासमार यामुळे महाराष्ट्राबाहेरील लोकांनी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणी आपल्या गावी जाणे पसंद केले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या मजदूरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी खास रेल्वे गाड्याही सोडल्या आहेत.
मुंबईत उपासमार होत असल्याने आणि कोरोनाच्या भीतीने माजदूरांनी स्थलांतर केले आहे. मात्र मुंबईमध्ये लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून दुधाची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. या दुधाच्या दुकानचालकांचा धंदा लॉकडाऊनमध्येही सुरू असताना दुधाचे दुकान चालवणारे लोकही मुंबई सोडून गेले आहेत. मुंबईमधील घाटकोपर विभागात असा प्रकार पाहायला मिळाला आहे. दुधाचे दुकान चालवणारे मुंबईसोडून गुजरात, राजस्थानला गेल्याने घाटकोपरमधील 18 दुधाची दुकाने बंद पडली आहेत.
दुधाची दुकाने बंद करून दुकानचालक गावी गेल्याने ते कोरोनाला घाबरून पळून गेल्याची चर्चा घाटकोपरमध्ये सुरू आहे. घाटकोपरमधील 18 दुधाची दुकाने बंद पडल्याने त्या दुकानातून दूध आणि दुधाचे पदार्थ घेणाऱ्या नागरिकांना इतर ठिकाणच्या दूध विक्रेत्यांकडे जाऊन आपल्याला लागणारे दूध आणि इतर पदार्थ विकत घ्यावे लागत आहेत. अशीच दुध डेअरीचे मालक दुकाने बंद करून आपल्या गावी गेल्यास काही दिवसांनी नागरिकांना दुधाच्या समस्येला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.