मुंबई - नशेपासून मुक्ती मिळावी, यासाठी अनेकांना नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या केंद्रातील लोकांना काही काळासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी प्रिया कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या बाजूने अॅड. नितीन सातपुते युक्तिवाद करणार आहेत.
मुंबई व इतर जिल्ह्यात नशामुक्ती केंद्रे आहेत. या नशामुक्ती केंद्रात सुमारे तीन हजारपेक्षा जास्त लोक आहेत. एका एका नशामुक्ती केंद्रामध्ये दोनशे ते तीनशे व्यक्ती उपचारासाठी दाखल आहेत. त्यांना नशामुक्त आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्था काम करत असतात. मात्र, सध्या करोना विषाणूचा प्रभाव आहे. व्यसन जडलेल्या व्यक्ती एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने राहत असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे या व्यक्तींना नशामुक्ती केंद्रातून काही काळासाठी सोडावे, या मागणीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.