मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प विविध कारणांनी सातत्याने चर्चेत असतो. या प्रकल्पाच्या कामाने शिंदे-फडणवीस शासन आल्यानंतर वेग घेतला असला तरी अद्याप पुरेसे काम झालेले नाही. म्हणूनच बुलेट ट्रेनच्या दैनंदिन कामावर आता अत्याधुनिक अशा ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. या कामासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या ड्रोनचा वापर 'आयजी ड्रोन' या कंपनीकडून करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.
अचूक आणि तंतोतंत माहिती: बुलेट ट्रेनच्या दैनंदिन कामाचा आढावा घेण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक ड्रोन हे अतिशय संवेदनशील असल्याने दररोजच्या कामाची अचूक माहिती आणि डाटा मिळणार आहे. या ड्रोनद्वारे बुलेट ट्रेन कामाचे 'हाय रेसोल्युशन' चित्र आणि व्हिडिओ उपलब्ध होणार आहे. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या प्रगतीचा सखोल तांत्रिक आणि विश्लेषणात्मक आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे कामाच्या स्थितीबाबत सरकारी यंत्रणा आणि वैधानिक यंत्रणांनाही कामाचा आढावा घेऊन नियोजन करता येणार आहे. आय जी ड्रोन या प्रतिष्ठित कंपनीला या दैनंदिन नियंत्रणाचे काम मिळाले असून याबाबत आम्हाला आनंद वाटत आहे आम्ही हे काम अतिशय चोखपणे बजावू, असा विश्वास या कंपनीचे सीईओ बोधिसत्त्व संघप्रिय यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकल्प? मुंबई ते अहमदाबाद हा सुमारे 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प अतिशय वेगाने काम सुरू आहे. बुलेट ट्रेन ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणार असून साबरमती ते मुंबई, बांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स हे अंतर केवळ दोन तासात कापले जाणार आहे. या मार्गावर एकूण बारा स्थानके असून यापैकी आठ स्थानके गुजरातमध्ये तर चार स्थानके महाराष्ट्रात आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 मध्ये बिलीमोरा ते सुरत दरम्यान सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन आणि केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत एक लाख कोटी रुपये इतकी आहे.