मुंबई Dr Bhalchandra Mungekar News : आयआयटी मुंबईच्या ह्युमॅनिटी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतातील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सुधन्वा देशपांडे यांना आयआयटीच्या कार्यक्रमात ऑनलाईन आमंत्रित केल्यामुळं वादंग झालाय. सुधन्वा देशपांडे यांना बोलवण्यात आल्यावरुन प्रतिगामी विचाराच्या विवेक विचार मंच विद्यार्थी संघटनेनं प्राध्यापिकेला देशद्रोही म्हटलंय. त्यानंतर आयटी मुंबईनं आता विद्यार्थी आणि प्राध्यापकांना परवानगी घेऊनच लेक्चर आयोजित करण्याचा फतवा रजिस्ट्रारकडून जारी केलाय. दरम्यान, यावर माजी कुलगुरू आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
एका विद्यार्थ्याला खटकलं म्हणून तक्रार आणि आंदोलन : 6 नोव्हेंबर 2023 रोजी आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी ऑनलाइन कार्यक्रमात प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते सुधन्वा देशपांडे यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी अतिथी वक्ते सुधन्वा देशपांडे यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, सुधन्वा देशपांडे यांनी आपली भूमिका मांडतांना पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांच्या कृतीचं समर्थन केलं, असं म्हणत ओंकार सुपेकर या विद्यार्थ्यानं पोलिसांत तक्रार केली. तसंच याप्रकरणी विवेक विचारमंच या विद्यार्थी संघटनेकडून आंदोलनही करण्यात आलं. त्यानंतर सुधन्वा देशपांडे यांनी हमासबाबत कोणतंही विधान केलं नसल्याचा खुलासा पत्राद्वारे केला होता.
अभ्यासक्रमाला नोंदणी नसताना विद्यार्थ्यांनी वर्गात घुसून केलं रेकॉर्डिंग : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांनी लेक्चर सुरू असलेल्या वर्गात प्रवेश केला. त्यांनी मोबाईलवर लेक्चर रेकॉर्ड केलं अन् ते ऑनलाइन पोस्ट केलं. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या प्राध्यापकांनी असं करणे नियमानुसार नाही असं बजावलं. तरीदेखील त्यांनी प्राध्यापकांचं ऐकलं नाही. त्यानंतर विवेक विचार मंच प्रतिगामी संघटनेनं आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केलं. तसंच प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांची पोस्टर लावून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आयआयटीची भूमिका : या सर्व प्रकरणानंतर मुंबई आयआयटी रजिस्ट्रार यांनी आता कोणतेही राजकीय उपक्रम किंवा सेमिनार असल्यास विद्यार्थी तसंच प्राध्यापकांनी ते परवानगी घेऊन करावे, अशी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या संदर्भात आयआयटी मुंबई संचालक सुभाष चौधरी म्हणाले, या संपूर्ण प्रकरणानंतर जे विद्यार्थी नियम तोडून अशाप्रकारे आंदोलन करतील. त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल. या प्रकरणावर 'सत्यशोधन समिती' आयटी मुंबईनं स्थापन केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच या संदर्भात निश्चित काही सांगता येईल.
अकॅडमी फ्रीडम आणि पंडित नेहरूंच्या विचारांवर हल्ला : यासंदर्भात माजी कुलगुरू, माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, जेएनयू विद्यापीठानंतर आता माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी उभारलेल्या आयआयटी मुंबईला प्रतिगामी संघटना लक्ष्य करीत आहेत. हा अकॅडमिक फ्रीडम आणि पंडित नेहरूंच्या विचारांवर हल्ला आहे. हमास किंवा इस्त्रायल कोणत्याही हिंसेचं समर्थन नाहीच. इस्त्रायलनं केलेल्या नरसंहारा विरोधात भारत सरकारनं विरोध केलाय. परंतु राज्यातील लेखक कलाकार प्राध्यापक यांनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
हेही वाचा -