मुंबई - लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना हलविण्यासाठी रेल्वेतर्फे श्रमिक स्पेशल गाड्या सोडण्यात येत आहेत. परराज्यांमध्ये किंवा राज्याच्या अंतर्गत भागात ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना शासकीय यंत्रणांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही, तोपर्यंत राज्यातील रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ज्या राज्यात कामगार अडकले आहेत आणि त्यांना ज्या राज्यात जायचे आहे, तेथील राज्य सरकारने याबाबत परस्पर समन्वयाने नियोजन करायचे आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या प्रवाशांची आरोग्य तपासणी दोन्ही राज्यांनी रेल्वे स्थानकांवर करायची आहे. तसेच याबाबतचे नियोजन पूर्ण झाल्यावर श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात येईल, असेही रेल्वेने म्हटले आहे. देशात सर्वाधिक स्थलांतरित कामगार मुंबईमध्ये अडकले आहेत. रेल्वे कोणतीही तिकीट विक्री करत नसून कोणालाही वैयक्तिक माहिती दिली जाणार नाही.
श्रमिक स्पेशल रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला शासकीय यंत्रणेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्या परवानगीची खातरजमा करूनच त्यांना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात येईल. त्याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. तेथे नोंदणी झाल्यावर प्रवाशांना रेल्वे गाडीची वेळ कळविण्यात येईल, त्यानंतरच त्यांनी स्थानकावर यायचे आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- Breaking : मुंबईत भाजी विक्रेत्याने पकडली पोलिसाची कॉलर.. पोलिसांनीही दाखवला खाक्या