मुंबई - असंघटीत क्षेत्रामध्ये घरकामगार महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या कल्याणासाठी घरकामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे, अशी सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत केली. यासंदर्भात घरकामगार महिलांच्या कल्याणासाठी योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले. तसेच 8 जानेवारी रोजी घरकामगार दिन असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घरकामगार महिलांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूर्ण क्षमतेने पुनरुज्जीवित करणे आवश्यक -
यावेळी ॲड. ठाकूर यांनी विविध घरकामागर संघटनेच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणी यांची माहितीही दिली. असंघटीत कामगारांमध्ये घरकामगारांची संख्या मोठी असून त्यात बहुतांश महिला आहेत. कोरोना परिस्थितीमुळे टाळेबंदीच्या कालावधीत घरकामगार महिलांना खूप संकटांना सामोरे जावे लागले. काम बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. असंघटित असल्यामुळे त्यांच्या समस्यादेखील प्रशासनापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे असंघटीत कामगार कल्याण बोर्ड पुन:श्च पूर्ण क्षमतेने पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. तसेच घरकामगार महिलांची नोंदणी हाती घेणे आवश्यक आहे. घरकामगार महिलांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक असून त्यादृष्टीने योजना तयार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका ॲड. ठाकूर यांनी यावेळी मांडली.
उपाययोजनांच्या अनुषंगाने सूचना मागविण्यात येणार -
त्यावर कामगार मंत्री वळसे पाटील म्हणाले की, असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. घरकामगारांची नोंदणी, त्यांना केंद्रस्थानी ठेऊन आखावयाच्या योजना तसेच त्यांच्या कल्याणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी घरकामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना, संस्था, तज्ज्ञ व्यक्ती यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र बर्ड फ्ल्यूपासून अजून तरी दूर; नागरिकांनी काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला