मुंबई : उद्यापासून दिवाळी उत्साहात सुरू होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर मार्केट विविध वस्तूंमूळं फुलून गेलंय. यावेळी विक्रेत्यांशी ईटीव्ही भारतनं संवाद साधला आहे.
विविध आकाराच्या पणत्या : बाजारात यंदा मातीच्या पारंपरिक पणत्यांसोबतच रंगीबेरंगी फुलं, नेत्रदीपक रोषणाई, फुलांनी सजलेला बाजार, सुंदर अशा चिनी मातीच्या मेणाच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या आकारातील तसंच सुंदर रंगसंगती असलेल्या पणत्यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळतेय. त्याचसोबत रांगोळी सुद्धा वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असून महिलांनी रांगोळीसाठी विशेष गर्दी केली आहे. यंदा रांगोळीचे तसंच इतर वस्तूंचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्याचं विक्रेत्यानं यावेळी बोलताना सांगितलंय. मात्र दर वाढीचा फारसा परिणाम ग्राहकांवर झालेला नाही, असं रांगोळी विक्रेते ऋषिकेश भगत यांनी सांगितलं.
फराळाच्या साहित्याची जोरदार खरेदी : दादरमध्ये असलेल्या महाराष्ट्र बाजारपेठेतून महिलांनी मोठ्या प्रमाणावर यंदा फराळाच्या साहित्याची खरेदी केली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा महिलांनी या खरेदीमध्ये अधिक उत्साह दाखवल्याचं महाराष्ट्र बाजारपेठेचे कौतिक दांडगे यांनी सांगितलं. महिलांना खरेदी करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी बाजारपेठेच्या वतीनं विशेष सवलत देण्यात येत आहेत. सुपर मार्केटच्या माध्यमातून महिलांनी दरमहा एक हजार रुपयांची खरेदी केल्यास त्यांना एक वर्षानंतर प्रत्येकी हजार रुपय खरेदीसाठी दिले जातात. त्यामुळं महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदीला येतात, असं दांडगे यांनी सांगितलं.
आकाश कंदीलांमध्ये वैविध्य : दिवाळीमध्ये प्रत्येक घरोघरी आकाश कंदील हा आपल्याला दिसतोच. या आकाश कंदीलामध्ये सुद्धा यावर्षी वैविध्य पाहायला मिळत आहे. पर्यावरण पूरक आकाश कंदील तसंच कागदी, कापडी आकाश कंदीलाचे सुबक आकार, रंगसंगती ग्राहकांना आकर्षित करत आहे. फटाक्यांची दुकाने, फराळाचे स्टॉल मुंबईकरांना खरेदीसाठी खुणावत आहेत. चिवडा, चकली, अनारसे आदी पदार्थ खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा -