मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मालाड येथे मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र काही राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) तपासानंतर दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
सुशांत सिंग राजपूतचाही समावेश: मुंबईस्थित व्यवस्थापक दिशा सालियन हिचा मृत्यू अपघाती होता, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले आहे. दिशा सालियन ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती आणि तिने काही सेलिब्रिटीसाठी काम केलं होतं. ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतचाही समावेश आहे. ती प्रामुख्याने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून लोकप्रिय झाली.
उडी मारून आत्महत्या केली: दिशा सालियनने भारती सिंग आणि वरुण शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध भारतीय व्यक्तींसोबत काम केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ९ जून २०२० रोजी दिशाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अद्याप तिच्या आत्महत्येमागील कारणे समजू शकलेली नाहीत. ती आर्थिक संकटाचा सामना करत होती. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली अशी चर्चा होती.
दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का ?: अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण देशभर गाजले, त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसाआधी दिशा सालियान हिचा इमारतीवरुन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात तीची आत्महत्या की खुन असे प्रश्न उपस्थित केले गेले, दिशाच्या आत्महत्येचा तपास सुरु होता. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहेका हे पण तपासण्यात येत होते. दिशाने आत्महत्या केली नसून तीच्यावर अत्याचार करुन तीला ढकलून मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलीस तपासात तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नव्हते, त्यांनी या संदर्भात तसा अहवाल तयार केला आहे.