मुंबई - मुंबई महापालिकेत एकच कंत्राटदार विविध प्रकारची कंत्राटे मिळवत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला विहार तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे, तलावाभोवती सुरक्षेसाठी कुंपण बांधणे, टेहळणीसाठी मनोरा बांधणे आदी कामासाठी २६ कोटींची कंत्राट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे २५ टक्के कमी दराने हे कंत्राट देण्यात आले आहे.
हेही वाचा - सौरव गांगुलींच्या जबराट निर्णयाने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना येणार 'अच्छे दिन'
मुंबईला 7 तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी विहार हा एक तलाव आहे. विहार तलावामधून मुंबईला दररोज ९० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावाची साठवण क्षमता ४१ हजार ४५९ दशलक्ष लिटर इतकी आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र १८.९६ चौरस किलोमीटर इतके आहे. विहार तलाव पवई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आयआयटी संस्था, भांडूप जलशुद्धीकरण संकुल यांनी वेढलेला आहे. तसेच तलावातील पाणी विहार गाळणी केंद्रामधून शुद्ध करून पवई जलाशय येथे पाठविण्यात येते. त्यानंतर ते पाणी जलवाहिन्यांमधून मुंबईकरांना पुरवले जाते.
हेही वाचा - क्यार चक्रीवादळ 'एडनच्या आखाता'च्या दिशेने रवाना; भारतातील काही राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
विहार तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याला भेगा पडून पाणी झिरपत असल्याने तलाव दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती व पिचिंग करणे, तलावाभोवती सुरक्षेसाठी कुंपण बांधणे, टेहळणीसाठी मनोर उभारणे आदी कामे मे. रिद्धी इंटरप्राइजेस या कंत्राटदाराकडून करून घेतली जाणार आहेत. याआधी संबंधित कंत्राटदाराने जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडच्या बाजूकडील डांबरी पट्टयांची सुधारणा करण्याचे काम केले आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तलावाच्या दुरुस्तीचे काम दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार तलावाच्या दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे करेल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.