मुंबई - माझ्या एका पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने मंत्र्यांना तासनतास बैठकी घ्याव्या लागल्या. एवढ्या बैठकी कोरोनाविरोधातील लढाईसाठी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरेशी असते, फेकाफेकीसाठी तीन लोक लागतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला. फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आज महाविकासआघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब यांनी सरकारची बाजू मांडली. यानंतर फडणवीस यांनी लगेच त्याला उत्तर दिले आहे.
'सरकारमधील मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णत: विसंगत माहिती देत माझी पत्रकार परिषद खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. एक तर त्यांना माहिती अपुरी आहे किंवा माहिती न घेता किंवा माहिती असूनही चुकीचे प्रतिपादन त्यांनी केले. गहू 2 रूपये किलो आणि तांदूळ 3 किलो हा केंद्र सरकारकडूनच राज्यांना येतो. शिवाय, या दराने राज्य सरकार तो विक्री करतो आणि ते पैसे जनतेकडूनच वसूल होतात. केंद्र सरकार तो 24 रूपये आणि 32 रूपयांनी विकत घेतो. तो राज्य सरकारला मिळाला नाही आणि तो कुठे आहे, हा प्रश्न अनिल परब यांना का पडावा, हे मला कळत नाही', असे फडणवीस म्हणाले.
'एका रेल्वेचा खर्च 50 लाख रूपये हे मी ठरविलेले नाही. ते रेल्वे मंत्रालयाने ठरविलेले आहे. यात तिकिटासाठी 7 ते 9 लाख रूपये लागतात. पण, रेल्वेला एक ट्रेन ऑपरेट करायला 50 लाख रूपये खर्च येतो. कापूस खरेदीचे सर्व पैसे केंद्र सरकार देते, त्याची आकडेवारी आपण कालच दिली आहे. 'डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेस'चे पैसे ज्या खात्यात जायला पाहिजे, त्याच खात्यात ते गेले आहेत आणि याची घोषणा स्वत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे', असेही फडणवीस म्हणाले.
पीपीई कीट्स राज्याला मिळाल्या नाहीत, असे राज्य सरकारने सांगितले. केंद्र सरकारने एक डायनामिक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यावर रोज कोणत्या राज्याला किती सामग्री याची माहिती अपडेट केली जाते. त्यानुसार, 26 मे पर्यंत 9.88 लाख पीपीई कीट, 16 लाख एन-95 मास्क दिले आहेत. ही सामग्री आम्ही विकत घेतो हे सांगत असताना ते हे सांगायला विसरले की, हे विकत घेण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने 468 कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
'राज्यात कोरोना चाचण्या अधिक त्यामुळे अधिक रुग्णसंख्या, हे सुद्धा पूर्णत: असत्य आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. एकूण चाचण्या आणि त्यातून पॉझिटिव्ह येणार्या रुग्णांची संख्या आज संपूर्ण देशात 5 टक्के पॉझिटिव्ह तर महाराष्ट्रात 13.5 टक्के आहे. मे महिन्याचा विचार केला तर मुंबईत 32 टक्के हा पॉझिटिव्हीटी दर आहे. मला प्रश्न पडतो की, हे तीन मंत्री कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचे काम करतात. मोठ्या प्रमाणात चुकीची आणि विसंगत माहिती त्यांनी दिली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
'महाविकासआघाडीतील या तीन मंत्र्याची पत्रकार परिषद म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल असा प्रयत्न आहे. केवळ आभासी अशा घोषणा करायच्या आणि देशातील 33 टक्के रूग्ण ज्या राज्यात आहेत. 40 टक्के मृत्यू ज्या राज्यात आहेत, त्या राज्याचे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आम्ही कसे उत्तम काम करतो आहोत हे सांगण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात. अशा पत्रकार परिषद घेण्याऐवजी एकत्रित बसून मुंबईत रुग्णांना बेड मिळत नाही, त्यांचे काय करणार हे सांगा? मुंबईत रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यावर मृत्यू होतात, ते थांबविण्यासाठी काय करणार, हे सांगा? मुंबईत चाचण्या होत नाही, त्यावर सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची, यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्के माहिती आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, असेही फडणवीस म्हणाले.
'सरकार आपली पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहे. आज मंत्र्यांनी राज्याची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रासह मुंबईत जे रुग्ण वाढत आहेत त्यांच्या सोयीसुविधांसाठी आणि महाराष्ट्राचा हिताचा या सरकारने विचार करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेहमी तुम्हाला सहकार्य करत आहोत. मात्र, सारखं केंद्राला दोष देण्यात अर्थ नाही, असेही फडणवीस म्हणाले.