मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'वंदे भारत' या पहिल्या सेमी हायस्पीड एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. मोदींनी झेंडा दाखवल्यानंतर सकाळी 10 वाजता ही एक्सप्रेस नवी दिल्लीवरून वाराणसीला रवाना होणार आहे. पंतप्रधान या ट्रेनमधून प्रवास करणार होते. मात्र, जम्मू काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षा समितीची बैठक होणार आहे. त्यासाठी ते निघणार आहेत. त्यामुळे मोदी फक्त झेंडा दाखवून या ट्रेनचा शुभारंभ करतील.
दिल्ली येथून रवाना होणारी ही एक्सप्रेस कानपूर आणि इलाहाबाद रेल्वे स्थानकावर ४० मिनिटे थांबेल. या गाडीची ताशी १३० किमी वेगाने चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसीदरम्यान ताशी १६० किमी वेगाने प्रवास करेल. वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्लीहून सकाळी ६ वाजता सुटेल आणि कानपूर-इलाहाबाद प्रवास करत दुपारी २ वाजता वाराणसीला पोहचेल. वाराणसी येथून दुपारी ३ वाजता सुटेल आणि रात्री ११ वाजता नवी दिल्लीत पोहचेल.
देशातील पहिली इंजिनलेस ट्रेन
वंदे भारत एक्सप्रेस ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आईसीएफ) तयार करण्यात आली आहे. या एक्सप्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे इतर एक्सप्रेसप्रमाणे याचे इंजिन दिसणार नाही. शताब्दी एक्सप्रेसहून यात अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात १६ वातानुकूलित कोच असून त्यात २ एक्झिक्यूटीव श्रेणी असणार आहे. या गाडीची प्रवासी क्षमता एकूण ११२८ आहे. १७ फेब्रुवारीपासून irctc.co.in या वेबसाईटवर प्रवाशांना या गाडीसाठी जागा आरक्षित करता येणार आहे.
तिकीट दर
दिल्ली-वाराणसी एसी क्लासचे तिकीट १७६० रुपये, तर एक्झिक्यूटीव क्लासचे तिकीट ३३१० रुपये आहे. परतीच्या प्रवासासाठी चेयर कार एसीचे तिकीट १७०० रुपये आहे. एक्झिक्यूटीव क्लासचे तिकीट ३२६० रुपये असणार आहे. हे शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत १.४ पट आहे.
अत्याधुनिक सुविधा
या ट्रेनमध्ये वाय-फाय, जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. विशेष म्हणजे ट्रेनमधील आसने 360 अंशामध्ये कशीही फिरवता येणार. यात कोचला दिव्यांगांसाठी विशेष बाथरूम आणि बेबी केअरवर विशेष स्थान देण्यात आले आहे.
संपूर्ण ट्रेन वातानुकूलित आहे. दिल्लीहून सुटणारी ही ट्रेन फक्त कानपूर आणि इलाहाबाद या २ स्थानकांवर थांबेल. भारतातील सर्वात गतीशील इंजिनलेस ट्रेनचे नाव बदलून 'वंदे भारत एक्स्प्रेस ' करण्यात आले. सुरुवातीला या ट्रेनचे नाव 'ट्रेन 18' असे होते. या ट्रेनच्या निर्मितीसाठी ९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ट्रेनच्या निर्मितीसाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागला आहे.