मुंबई : पंतप्रधानांच्या एक दिवसाच्या दौऱ्यादरम्यान मुंबईतील काही विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे कटआउट पाहायला मिळत आहेत. तसेच संपूर्ण मुंबईत पंतप्रधानांच्या स्वागताचे बॅनर्स देखील झळकत आहेत. मात्र, या सर्वात लक्ष वेधणारे कटआउट वांद्रे पूर्व येथील कलानगरमध्ये पाहायला मिळत आहेत. कलानगर जंक्शन येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे कटआउट लावण्यात आले आहेत. या नेत्यांच्या सोबतच बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कटआउट या परिसरात लावण्यात आलेले आहेत.
हा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न : कलानगर जंक्शन येथेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे खासगी निवासस्थान आहे. त्यामुळे मातोश्री निवासाच्या अगदी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे हे मोठे कटआउट लावले गेले आहेत. अगदी मातोश्री बंगल्यासाठी आत जाताना असणाऱ्या ठिकाणीच कटआउट लावण्यात आल्याने हा उद्धव ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वांद्रामध्ये पंतप्रधानांची जंगी सभा? वांद्रे बीकेसी येथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला एका भव्य सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही हजर राहणार आहेत. त्यामुळे या सभेत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोणता विकासमंत्र देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भाषणाच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे गट असण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते या कामांच्या उद्घाटनाची शक्यता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येऊन काही सेवांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये 'एमएमआरडीए'च्या अखत्यारीतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. याचबरोबर मुंबईत तीन मोठ्या रुग्णालय निर्मितीच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम देखील त्यांच्या हस्ते पार पाडणार आहेत. मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चारशे किमीच्या सीसी रोडच्या कामाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडणार आहे.
हेही वाचा : Shiv Sena Symbol Row : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज निवडणूक आयोगात होणार सुनावणी