मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मागच्या वर्षी दसरा मेळाव्यामध्ये 3 हजारपेक्षा अधिक बस आणून विक्रम केला होता. लाखो लोक त्या ठिकाणी जमा केले होते. परंतु त्या कार्यक्रमासाठी 10 कोटी रुपयेपेक्षा अधिक खर्च झाला होता. याप्रकरणी तक्रार करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत आज सुनावणी झाली असता याचिकाकर्त्याला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
याचिका दाखल : वर्ष 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घेतला होता. हा मेळावा मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर आयोजित केला होता. त्यासाठी राज्यभरातून विविध कार्यकर्ते आणि जनता यांना मोफत राज्य परिवहन विभागाच्या बसेसने आणले होते. यासाठी मुंबई विद्यापीठाची काही जागा वाहनस्थळ म्हणून देखील भाड्याने घेतली गेली होती. त्याबाबत विरोधी पक्षांनी ओरड देखील केली होती. मात्र या मेळाव्यासाठी साधरण 10 कोटी रुपये खर्च झाला होता. हा पैसा मुख्यमंत्र्यांनी कुठून आणला. त्याचा आधार काय यासंदर्भात चौकशीत करण्यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. त्याबाबत आज सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिका कर्त्याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रतिज्ञापत्र सादर करा : याचिकेमध्ये अधिवक्ता नितीन सातपुते यांनी बाजू मांडली की," मुख्यमंत्र्यांनी मुंबई बीकेसी येथे दसरा मेळावा घेतला होता. त्यामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केले होते. कारण राज्यातून 3 हजार राज्य परिवहन विभागाच्या बसेस त्यात लावण्यात आल्या होत्या. खासगी वाहनेदेखील वापरण्यात आली, त्यामुळे रोखीने व्यवहार झाला की ऑनलाईन व्यवहार झाला याचे सर्व तपशीला सकट चौकशी झाली पाहिजे." याचिकाकर्त्याचे मुद्दे जरी रास्त असतील तरी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने आजची सुनावणी तहकुब केली.
हेही वाचा -