मुंबई - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईत 65 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या महिलेला 23 मार्चला श्वसनाच्या त्रासामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा दीर्घकालीन आजार होता.
मुंबई परिसरातील कोरोनाचा हा पाचवा मृत्यू आहे. मुंबईतील 3 तर मुंबईबाहेरील 2 अशा 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत मुंबईमधील 52 तर मुंबईबाहेरील 25 रुग्ण असे एकूण 77 रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली आहे. त्यापैकी 17 मार्च, 21 मार्च, 22 मार्च आणि 24 मार्चला 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईमधील २ आणि मुंबईबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. त्यात आज आणखी एका मृत्यूची भर पडली आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 125वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच काल मुंबई, सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली.