केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध; आज राज्यपालांना भेटणार काँग्रेसचे शिष्टमंडळ - महाविकास आघाडी सरकार
केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच या कायद्याला विरोध करत हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी हे शिष्ट मंडळ राज्यपालांना भेटणार आहे.
मुंबई - काँग्रेसेच शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच या कायद्याला विरोध करत हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी हे शिष्ट मंडळ राज्यपालांना भेटणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रविवारी माहिती दिली.
केंद्राचे कृषीधोरण राज्यात अंमलात आणले जाणार नाही, या संदर्भात महाविकास आघाडीच्या इतर पक्षांसोबतही आम्ही चर्चा करू मी आज(रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवारही होते. आमचा या कृषी कायद्याला विरोध असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ते कायदे मागे घेण्याच्या मागणी संदर्भात आज काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.
केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधात जे कायदे पास केले आहेत, काँग्रेसकडून त्याचा विरोध देशव्यापी आंदोलन करून केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले जाणार असून त्यासाठी एक कोटी सह्यांची मोहीम राबविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रभारी एच.के. यांनी 25 सप्टेबरच्या पत्रकार परिषदेत दिली होती.
केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा यासाठी काँग्रेसने हे देशव्यापी आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि केवळ मुठभर भांडवलदारांचे हित साधण्यासाठी हा कायदा आणला आहे. शेतकऱ्या देशाचा कणा असून त्याला आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने केंद्र सरकारला या कृषी एमएसपी कायद्या विरोधात दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, 2 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर दरम्यान शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल. तसेच राज्यात २ ऑक्टोबरला सुद्धा आंदोलन केले जाणार आहे. तर राज्यात १० ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान परिषदही ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजित आहे.