मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आहेत. यामुळे कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या 20 ऑक्टोबरपासून विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. ही विद्यापीठे कोरोना नियमांची अंमलबजावणी करून 50 टक्के क्षमतेने सुरू करावीत. तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहण्यासाठी लसीचे दोन डोस आवश्यक असल्याने ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी, असे निर्देश मुंबई महापालिकेने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
लसीकरण, कोरोना नियमांची अंमलबजावणी करा -
राज्य सरकारने विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करताना जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार, आरोग्यव्यवस्था यांचा विचार करण्यात यावा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या आदेशानुसार व सूचनांनुसार महाविद्यालये सुरू करावीत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने महापालिकेला पत्र देऊन मार्गदर्शक सूचना करण्याची विनंती केली होती. या पत्राला उत्तर देताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात यावी तसेच ज्या विद्यार्थी व शिक्षकांनी लसीकरण केले नाही त्यांच्यासाठी लसीकरण करून विशेष मोहीम राबवावी असे पालिकेने विद्यापीठाला कळविले आहे.
राज्य सरकारचे निर्देश -
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील नियमित वर्ग 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे वर्ग 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाची विचारविनिमय करून विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. 18 वर्षावरील विद्यार्थी ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. तेच विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. राज्यात सुरू होणारी सर्व विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना कोविड-19 व्यवस्थापनाबाबतचे निर्देश तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालय उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबत संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व मुंबई यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावी. महाविद्यालयातील विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण करण्यात यावे असे परिपत्रक काढण्यात आले आहे.