मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व खासगी कार्यालये, आस्थापने, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले आदी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देणे बंधनकारक आहे, असे राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात आलेली आहे. अशी सुट्टी किंवा सवलत मिळत नसल्यास आपले नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, काम करत असलेल्या आस्थापनाचे पूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, आस्थापना मालक किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी क्रमांक या तपशीलासह तक्रार दाखल करावी. ही तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख सुविधाकार (दूरध्वनी क्रमांक ०२२- २४३११७५१) किंवा महापालिकेतील संबंधित प्रभागातील तसेच विभाग कार्यालयातील कक्ष यांच्याकडे दाखल करता येईल.
कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५७३८३३, २६५७३८४४) येथेही तक्रार दाखल करता येईल. औद्योगिक क्षेत्राच्या संबंधातील तक्रारी संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, ५ वा मजला, सी-२०, ई- ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५७२५०४, २६५७२५०९) येथेही तक्रार दाखल करता येईल.