मुंबई - येथील साकिनाका परिसरात पाच वर्षांपूर्वी रस्ता ओलांडताना दोन बसच्या मध्ये चिरडून खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अहमद शेख, असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांनी बेस्ट विरोधात मोटार अपघात दावा लवादाकडे दाद मागितली होती. या प्रकरणी शेख यांच्या कुटुंबीयांना 47 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई येथील मोटार अपघात दावा लवादाने बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण
अहमद शेख (वय 37 वर्षे) हे विक्री आणि विपणन कार्यकारी म्हणून एका खासगी कंपनीत नोकरीला होते. ते महिना 18 हजार रुपये कमवत होते. पाच वर्षांपूर्वी 15 जुलै, 2015 रोजी शेख हे कामानिमित्त साकीनाका परिसरात गेले होते. त्यावेळी अंधेरी-घाटकोपर लिंक रोड येथे रस्ता ओलांडताना घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या बेस्टच्या बसने त्यांना धडक दिली आणि ते बेस्टच्या दोन बसमध्ये चिरडले गेले. त्या घटनेत शेख यांचा जागीच मृत्यू झाला होता. शेख यांच्या भावाने या प्रकरणी बसच्या चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. शेख यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यावर त्यांची पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलांच्या वतीने लवादाकडे दावा करण्यात आला. तसेच 55 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली गेली.
लवादामध्ये काय झाले
अहमद शेख यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना बेस्ट प्रशासनाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्या चुकीमुळेच अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बेस्टने केला. दोन बसमध्ये खूप कमी अंतर असल्याचे दिसून आणि बसचा चालक हॉर्न वाजवत असल्याकडे दुर्लक्ष करून शेख यांनी रस्ता ओलांडला. त्यांनी झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडण्याचेही टाळले. बसचा चालक योग्य त्या गतीनेच बस चालवत होता व तातडीने ब्रेक दाबून त्याने अपघात टाळण्याचा प्रयत्नही केला, असेही बेस्ट प्रशासनातर्फे लवादाला सांगण्यात आले. लवादापुढे बसचालकाचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्यानेही कमी वेगाने बस चालवत होता, असे लवादाला सांगितले.
लवादाने काय दिला आदेश
वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवले जात होते की नाही याला वाहनाचा वेग हा निकष असू शकत नाही, असे लवादाने म्हटले. तसेच बसच्या चालकाने दिलेल्या साक्षीचा दाखला देत शेख हे त्याच्या बससमोर कसे आले यातून त्याचा निष्काळजीपणा दिसून येतो. पोलिसांच्या सादर केलेल्या पुराव्यांतूनही शेख यांचा दोन बसमध्ये चिरडल्याने मृत्यू झाल्याचे आणि बसचालकाने बस दुसऱ्या बसवर जवळजवळ आदळलीच होती हे स्पष्ट होते. या सगळ्यातून बसचा चालक बेदरकारपणे बस चावलत होता हे सिद्ध होते, असे नमूद करत लवादाने शेख यांच्या कुटुंबीयांना 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - परदेशातून आलेल्या ४, ५५३ पैकी ३, १५५ प्रवासी मुंबईत क्वारंटाइन तर ३१६ प्रवाशांना सूट
हेही वाचा - फसवणूक झालेल्या 800 गृह खरेदीदारांच्या 22 वर्षाच्या लढ्याला अखेर यश; तिप्पट परतावा मिळण्यास सुरुवात