मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 जूनला) सकाळी 11 वाजता दिल्लीतील पंतप्रधान यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट घेणार आहेत. माजी न्यायाधीश दिलीप भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर राज्य सरकार कायदेशीर बाबीच्या तयारीला लागले आहे. मात्र, 102व्या घटना दुरुस्तीनंतर 50 टक्क्यांच्यावर आरक्षण राज्य सरकारला देण्याचे अधिकार राहिले नाहीत, असे याआधीच मुख्यमंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमिती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
आरक्षणाबाबत अधिकार आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये लक्ष घालून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती यादीत मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता खुद्द मुख्यमंत्री या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंठे हे सोबत असणार आहेत.
या मुद्द्यांवर होणार चर्चा -
आज मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या सोबत होणाऱ्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण या मुद्द्यावर तर चर्चा होणार आहे. यासोबत जीएसटी परतावा, लसीकरण मोहीम, राज्यातील कोरोना परिस्थिती या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या भेटी आधी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा -
काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील पंतप्रधान यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दरम्यान चर्चा होणाऱ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा सल्लाही घेतला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते.
राष्ट्रपतींना लिहिलं होतं पत्र -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधीच राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणाचा उपसमितीच्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रपतीने लक्ष घालावे, अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी राज्यपालांना दिले होते.
कांजूरमार्ग कारशेड प्रश्नी चर्चा होणार -
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार आणि भाजपात मागच्या काही महिन्यांपासून चांगलेच जुपलेले पाहायला मिळाले. मेट्रोचं कारशेड आरे येथेच व्हावे, अशी भाजपचे म्हणणे आहे. तर हे मेट्रोचे कारशेड कांजुर मार्ग येथे व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. कांजूरप्रश्नी पंतप्रधानांसोबत चर्चा होणार का? या प्रश्नावर मंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जे विषय महाराष्ट्र आणि केंद्राशी निगडित आहे त्या सर्व विषयांवर चर्चा होईल.