मुंबई - उद्यापासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावरकरांना वंदनही करत नाहीत, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लगावला होता. पण, ज्यांना सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीबद्दल देखील कळत नाही त्यांनी मला सावरकरांबद्दल सांगू नये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. तसेच आपल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रत्येक आरोप त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
पेट्रोलची 'सेंच्युरी' पाहण्याची वेळ
बेळगाव सीमाप्रश्नी विरोधकांना राज्य सरकारला सहकार्य करायचे असेल तर, त्यांनी केंद्रातून मदत आणावी. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना सीमाप्रश्न का सोडवला नाही? असा उलट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विचारला. सध्या विरोधक वीज बिलाबद्दल रस्त्यावर उतरून आक्रोश करताना पाहायला मिळतात. मात्र, रोज इंधनाचे दर वाढत चालले आहेत. त्याबद्दल विरोधक काही बोलत नाहीत. उलट राज्य सरकारकडे बोट दाखवले जाते. आजपर्यंत अनेक क्रिकेटच्या सेंच्युरी पहिल्या मात्र आता पेट्रोलची सेंच्युरी पाहण्याची वेळ आली, असा चिमटादेखील मुख्यमंत्र्यांनी काढला.
टाळेबंदी कोणालाच नको आहे
विरोधक केवळ थापा मारतात. खोटे बोला पण रेटून बोला असा त्यांचा अजेंडा आहे. विरोधकांना राज्य सरकारला मदतच करायची असेल, तर केंद्रामध्ये राज्य सरकारचा जो जीएसटीचा परतावा आहे, तो परत आणण्यात त्यांनी मदत करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खास करून अमरावती, यवतमाळ, अकोलासह ग्रामीण भागांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे, मास्क नियमित घातला पाहिजे, तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेला केले. तसेच उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वेळेत सध्या काही बदल करण्यावर विचार नसल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.