मुंबई - शिवसेना प्रमुखांना मी मुख्यमंत्री होईल, असे वचन कधीही दिले नव्हते. मात्र, शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असे वचन दिले होते. आजचा प्रसंग ही त्या वचनाची पूर्ती नाही तर हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. काहीजणांनी मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी वेगळा मार्ग स्वीकारला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज सेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
'आमचे अंतरंग भगवेच आहे,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला, अशी टीका झाली. मात्र, मला आज भाजपला विचारायचे आहे की, तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
'आमच्यावर वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तुम्ही त्यांचे तुकडे तुकडे केले आणि हे तुकडे तुकडे करणारे भक्तच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जनताच माझे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे मी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही,' असे मुख्यमंत्री म्हणाले. 'मला मिळालेले मुख्यमंत्री पद हा माझा मान आहे. येथून पुढे आता मला तुमची साथ, सोबत आणि संगत पाहिजे,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या वचनपूर्ती सोहळ्यात ११ मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.