मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी खासगी आणि कंत्राटी कामगार असलेल्या संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी मालकांनी तेथे काम करत असलेल्या कामगारांना मानवता म्हणून सुट्टीचा पगार द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काम बंद होईल, पण सुट्टीच्या पगार मिळणार नाही, अशा विवंचनेत कामगार आहेत. काही सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात कंत्राटी कामगार आहेत. मात्र, त्यांनाही अद्याप कोणत्याही सुट्टीबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, त्याचे पालन होईल की नाही, अशी कामगारांमध्ये चर्चा आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे असे सांगितले. राज्याला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी सरकारी निर्णयाचे पालन करून शहरात अनेक व्यवसाय, कार्यालये बंद राहणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळेल. पण हातावर पोट असणाऱ्यांचा पगार अधांतरी आहे. जे मालक व्यापारी पगार देणार नाहीत, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे मात्र अद्याप सरकारने स्पष्ट केलेले नाही.