विरार (पालघर) - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षिका सुमन रणदिवे यांची व्यथा पुढे आली होती. त्या राहत असलेल्या वृद्धाश्रमाची व्यथा सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी समाज माध्यमात पोहोचविल्यानंतर ठाकरे परिवाराकडून नुकसानग्रस्त वृद्धाश्रमाला मदत देण्यास सुरुवात केली आहे. या वादळाच्या तडाख्यात वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले असून सुमन यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध येथे राहत आहेत. याबाबत सुमन रणदिवे यांनी समाज माध्यमातद्वारे मुख्यमंत्री असलेल्या आपल्या विद्यार्थ्याला साद घालत मदतीची याचना केली होती. त्यानंतर आज (गुरूवारी) या वृद्धाश्रमात मदतीचा ओघ सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांच्याकडून बेड,उशा व जेवणाची सामग्री घेऊन मदत पोहचली आहे. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमीत ठाकरे यांनीही आपल्या वडिलांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी फोनवर संपर्क साधत त्यांची विचारपूस केली. आता लवकरच या वृद्धाश्रमावर पत्र्याच्या जागी स्लॅबचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
हेही वाचा-संभाजीराजे राज ठाकरेंच्या भेटीला