मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेची एकही जागा न लढवता पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लक्ष्य केले आहे. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या प्रचारात बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतले असल्याचा टोला राज ठाकरे यांना लगावला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोणत्याही योग्य माहिती शिवाय नेते बोलत असतात. त्या नेत्यांनी दादरच्या बाहेर येऊन ग्रामीण भागाची माहिती घ्यावी, उगाचच बिनबुडाचे आरोप करू नयेत. शहरातल्या लोकांना फक्त कंत्राटदारी कळते. नेत्यांनाही वाटत मोदींनी कंत्राट देऊन शौचालये बांधले की, काय, पण सरकारी अनुदानावर शौचालय बांधले जातात ही साधी माहिती ही या नेत्यांना नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे कोणतेही मुद्दे नाहीत. हा देश आता नवीन भारत आहे. नव्या भारत सुरक्षित हातात आहे. शत्रूला त्यांच्या देशात जाऊन मारण्याची धमकी या सरकारमध्ये आहे. मुंबई मध्ये २६/११ चा जो दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नरमाईची भूमिका घेतली. पण आता सर्जिकल स्ट्राईक होतात. मोदींचे हात आणखी मजबूत करायचे असतील तर शिवसेनेच्या उमेदवारांना ही दिल्लीत पाठवा, असे आवाहन ही त्यांनी केले. त्याच बरोबर उत्तर पश्चिम मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी वाचाळ वीर असा केला.