नवी मुंबई : आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडलाआहे. या अपघातातील जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातावद्दल राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या अपघातात १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २९ जण जखमी झाले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर : जुना मुंबई पुणे हायवेवर झालेल्या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एमजीएम रुग्णालयातील रुग्णांची पाहणी करून खोपोली खालापूर कडे रवाना झाले.
देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भेट दिली. तर देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. सर्व जखमींना खोपोली एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरू आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात 12 जणांचा मृत्यू , 29 जण जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बस अपघात कसा झाला यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
उदय सामंत यांनी घेतली रुग्णांची भेट: जुना पुणे मुंबई हायवेवर, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटात झालेल्या अपघातातील जखमींची विचारपूस व प्राथमिक मदत पुरविण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भेट दिली. तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.