मुंबई - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तर अजित पवार यांनी मंत्रालयात अभिवादन करून उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री अभिवादनात म्हणाले, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या रुपाने भारताला एक कणखर आणि धुरंधर नेतृत्व लाभले होते. त्या मुत्सद्दी राजकारणी तर होत्याच पण त्यांनी भारतीय जनतेच्या मनात विकासाभिमुख नेतृत्व म्हणून स्थान मिळवले होते. युद्ध, दुष्काळ, पूर अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीही त्यांनी नवीन योजना आखल्या. त्यांच्या धडाडीमुळे आणि निर्णय क्षमतेमुळे भारताची जागतिक पातळीवर ताकदवान देश, अशी प्रतिमा निर्माण झाली. भारतमातेच्या महान कन्या दिवंगत इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रीय एकात्मता अबाधित
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली. आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संवैधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, इंदिराजींनी देशाची स्वतंत्रता, एकता, अखंडता, सार्वभौमता टिकवण्यासाठी जीवनभर कार्य केले. त्यासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या कार्याचे व बलिदानाचे स्मरण करत असतानाच आपापसातील वाद, मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा व संपूर्ण देश हिंसाचारमुक्त करण्यात आपलेही योगदान असले पाहिजे. इंदिरा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचे तसेच स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याचेही त्यांनी स्मरण केले. बांगलादेशची निर्मिती, बँकाचे राष्ट्रीयकरण, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचे नेतृत्व करताना इंदिराजींनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.