मुंबई - उदयनराजे भोसले हे भाजपत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे असे राजे गेले तरी सातारा जिल्ह्यातील प्रजा मात्र आमच्या सोबतच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शनिवार) मुंबईत दिली.
हेही वाचा - इंदोरीकर महाराज राजकारणात ? अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी सांगितले की उदयनराजे गेले तरी त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला कोणताही फरक पडणार नाही. नेते जातात येतात त्यामुळे पक्ष काही संपत नसतो असे ते म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक
मी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा केली. त्यात अनेक उमेदवार अदलाबदली करणे, अथवा नवीन उमेदवार देणे यावर चर्चा झाली. आज जे आमच्या पक्षातून इतर पक्षात जात आहेत, त्यांना रोखणार कोण, परंतु जे जात आहेत, त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार उभा राहण्यासाठी तयार आहे. त्यामुळे जे जात आहेत, त्यांच्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा - हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश