मुंबई - राज्य शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याप्रमाणेच केंद्रीय संस्थाच्या कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासासाठी 1 जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने देखील आपल्या लाेकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविली आहे. मध्य रेल्वेवर 150 व पश्चिम रेल्वेवर 148 जादा फेऱ्यांची भर पडली आहे. एकूणच दिवसभरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 700 फेऱ्या मध्य व पश्चिम मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासाची मुभा देण्यासाठी साेमवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यामध्ये बैठक झाली हाेती. त्यामध्ये रेल्वेने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासाची मंजुरी दिल्यामुळे किती प्रवासी संख्या वाढेल याची माहिती राज्य सरकारकडे मागितली हाेती. जेणेकरुन लाेकल गाड्यांचे नियाेजन करण्यास मदत हाेईल. त्यानुसार राज्य सरकारने रेल्वेला माहिती पुरविल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा रेल्वे प्रशासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासासाठी 1 जुलैपासून मंजुरी दिली आहे.
मध्य रेल्वेवर राज्य सरकारने परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी लाेकलच्या 200 फेऱ्या होत होत्या. त्यात 150 फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या आता दिवसभरात 350 गाडया धावणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर 162 फेऱ्या हाेत्या.वाढत्या प्रवासी संख्येमुळे साेमवार 29 जून पासून त्यात 40 फेऱ्यांची वाढ केली गेली. आता बुधवारपासुन त्यात आणखी 148 फेऱ्यांची भर घालण्यात आली असून पश्चिम रेल्वेवरही जवळपास 350 फेऱ्या हाेणार आहेत.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या आयकार्डवर रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एका लाेकलमध्ये फक्त 700 प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. येत्या काही दिवसात राज्य सरकारतर्फे क्यु आर काेडचे आयकार्ड कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार अत्यावश्यक सेवेतील राज्य आणि केंद्रीय कर्मचारीच लाेकलचा प्रवास करु शकतात. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकात गर्दी करु नये असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा
आयकर विभाग, जीएसटी व कस्टम, पोस्ट खाते,स्टॉक एक्सेंज, नॅशनल बँंक कर्मचारी,बीपीटी, न्यायालय, राजभवन,ईतर केंंद्रीय कर्मचारी व संरक्षण विभागातील कर्मचारी