मुंबई : जगात अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. चीनमधील रुग्णालयांत रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाहीत. एवढेच नाही तर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. चीनमधील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्य सरकार देखील सतर्क ( Central and Maharashtra government alert ) झाले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी राज्यात लवकरच कोविड टास्क फोर्स ( Covid Task Force ) गठीत करणार असल्याची माहिती दिली आहे.
आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक - चीन व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या नवीन व्हेरिटएंच्या प्रादुर्भावामुळे भारताची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग ( genome sequencing test ) वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाबाबत चर्चा करणार आहेत.
राज्यात टास्क फोर्स गठीत होणार - चीनमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. बुधवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला कोविड टास्क फोर्स ( Covid Task Force ) आणि तज्ञांची समीती गठीत करण्याबाबात राज्य सरकारची काय तयारी आहे असा प्रश्न विचारला. तसेच कोरोनाविरोधात सर्व पक्ष मिळून राजकारण बाजूला ठेवून काम करून असे देखील अजित पवार म्हणाले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच टास्क फोर्स आणि तज्ञांची समती गठीत करण्यात येईल अशी माहिती दिली.
भारत जोडो यात्रा थांबवा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात उपाययोजना आखायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधी यांना ( Rahul Gandhi ) पत्र लिहून भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) थांबवण्याचे आवाहन केले आहे. ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करावे आमि नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी’, असे मांडवीय यांनी या पत्रात म्हटले आहे. याशिवाय मनसुख मांडवीय यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील पत्र लिहून यात्रा थाबवण्याचे आवाहन केले आहे.
पहिला रुग्ण - कोरोना महामारीत पहिला कोरोना बाधित रुग्ण चीनमध्येच आढळला होता. तेव्हापासून चीन कोरोना महामारीशी झुंज देत आहे. ऑक्टोबर पर्यंत देश कोरोना मुक्तची वाटचाल करत होता. सर्व गोष्टींवरील निर्बंध शिथिल केल्यावर आता पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. साल २०२३ मध्ये चीनमध्ये कोरोना माहामारीने लाखो व्यक्तींचा बळी जाऊ शकतो अशी शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. चीनच्या एक तृतीयांश व्यक्तींना तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो असेही सांगण्यात आले आहे. यूएस- आधारित इनस्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅंड इव्हॅल्युएशन (IHME)ने ही शक्यता व्यक्त केली आहे.
१ एप्रिल पर्यंत मृतदेहांचे खच - १ एप्रिल पर्यंत चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला असेल. यावेळी मृत्यूंची संख्या ३२२,००० पर्यंत पोहचलेली असू शकते. चीनच्या एक तृतीयांश लोकांचा यामुळे बळी जाऊ शकतो, असा अंदाज आयएचएमईचे संचालक क्रिस्टोफर मरे यांनी व्यक्त केला आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोविड निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींची नोंद ठेवलेली नाही. ३ डिसेंबर रोजी शेवटच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अशात चीनमध्ये आतापर्यंत ५,२३५ अधिकृत मृतांचा आकडा नोंदवला गेला आहे. चीन खरी आकडेवारी दाखवत नसल्याचा आरोप इतर देशांतून केला जात आहे.