मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येणे, जाणे सोपे व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्मार्ट कार्ड तसेच मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करुन दिली आहे . मात्र खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांकरिता अशा प्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Ughdav Thackeray) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शाळेपर्यंत ये जा करणे सोपे व्हावे यासाठी २०० ते ३५० रुपयांत बस पास द्यावेत (Bus passes for school children) असे आदेश दिले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार इयत्ता ५ वी पर्यंत रु. २०० इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत रु. २५० आणि इयत्ता ११ वी १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता रु. ३५० इतक्या सवलतीच्या दरामध्ये नवीन बसपास दिला जाणार आहे. या पासवर विद्यार्थी एसी आणि नॉन एसी बसमधून प्रवास करू शकणार आहेत.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन म्हणजेच चलो अॅपद्वारे तसेच ऑफलाईन देखील अर्ज करु शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आगारात येण्याची गरज भासणार नाही. सदर योजनेची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. बसपास योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे. याचा फायदा मुंबईमधील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
हेही वाचा : Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी