मुंबई : तेलंगणामधील तेलुगु भाषिक ज्येष्ठ कवी आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले वरावरा राव यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे जायला परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गुरूवारी झालेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने या त्यांच्या अर्जाची पडताळणी करावी, असे निर्देश दिले आहेत. भीमा कोरेगाव या ठिकाणी 200 वर्ष पूर्ण होत असतानाच्या मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंसाचार झाला.
वैद्यकीय कारणासाठी न्यायालयात अर्ज : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत हे ज्येष्ठ कवी वरावरा राव असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक देखील केली होती. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यांना अनेक दिवस सरकारी हॉस्पीटलमध्ये कोरोना महामारीच्या काळात दाखल करण्यात आले होते. सध्या ते जामिनावर आहेत. वरावरा राव यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितले की, 'त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे त्यांना आरोग्य उपचार घेण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जायला हवे.
दस्ताऐवज कागदपत्रे : यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी म्हटले की, जर वस्तुस्थिती तशीच असेल तर ठीक आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी असेल तर मग मात्र या खटल्याचा रंग बदलू शकतो. मात्र वरावरा राव यांचे वकील सत्यनारायण यांनी म्हटले, मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या संदर्भात तेलंगणा राज्याचे जे काही नियम आहे, त्यासाठी जी प्रक्रिया आहे. त्याबाबतचे सर्व दस्ताऐवज कागदपत्रे याचिकेमध्ये जोडलेले आहेत, त्याचे न्यायालयाने अवलोकन करावे.
अर्जाची छाननी आणि पडताळणी : न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सांगितले की, वरवरा राव हे सध्या जामिनावर आहे. ते जर जामीनावर नसते, तुरुंगात असते तर तुम्ही अशा प्रकारचा अर्ज केला असता काय? म्हणूनच याबाबत राष्ट्रीय तपास संस्था यांच्या अर्जाची छाननी आणि पडताळणी करेल, मगच त्याबाबत पुढील सुनावणी होईल. याबाबत 5 जून रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने न्यायालयाला काय पडताळणी केली ते कळवावे, असे देखील न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले.