मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) रिया चक्रवर्तीची चौकशी केली. त्यातून मिळालेल्या माहितीवरून एनसीबी आता अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग व सिमोन खांबाटा या तिघींना चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत. सुशांत पवना डॅम जवळच्या बेटावर पार्टी करण्यासाठी जायचा. त्या ठिकाणी अभिनेत्री सारा अली खानसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा जात असल्याचे एनसीबीच्या तापासत समोर आले आहे. सुशांतच्या बोटमनने एनसीबीला ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एनसीबीने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, मुंबईतून आतापर्यंत एनसीबीच्या तपासात 16 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील काही आरोपींच्या चौकशीतून मिळणाऱ्या माहितीवरून बॉलिवूडमधील आणखी काही जणांना समन्स पाठवले जाणार आहेत. सध्या सुशांतच्या जास्त संपर्कात राहिलेल्या सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती व दिपेश सावंत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून सत्र न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. हे सर्वजण जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्डवरून हे स्पष्ट होत आहे की, बॉलिवूडमधील काहीजण अमली पदार्थांच्या मागणीसाठी ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होते.
एनसीबीच्या पथकाडून 13 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींपैकी 3 आरोपींना न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. यात करमजित सिंग, डेवाईन फर्नांडिस, अंकुश अरनेजा यांना १६ सप्टेंबरपर्यंत एनसीबी रिमांड मिळाली आहे. संदीप गुप्ता व आफताब फतेह अन्सारी यांना 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर संकेत पटेल याला न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. अटक आरोपी करमजीत सिंग हा सॅम्युअल मिरांडाच्या संपर्कात होता. करमजीत सिंगने दिलेले अमली पदार्थ सॅम्युअलच्या माध्यमातून रिया, शोविक व सुशांतपर्यंत पोहचत होते, असे एनसीबीच्या एफआयआरमध्ये म्हणण्यात आले आहे.