मुंबई - कॅन्सरवर उपचार करणे महागडे आहे. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे हे महागडे उपचार परवडत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पहिल्यांदाच कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शरीरातील इतर पेशींना धक्का न लावता फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करणाऱ्या 'प्रोटोन थेरपी'सह केमोथेरपी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डेटा अनालेसीस, ब्रेकीथेरपीसह कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत.
प्रकल्पासाठी १०० कोटींचा खर्च -
मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचे काम पालिकेकडून केले जाते. पालिकेच्या केईएम, नायर, सायन, ट्रॉमा केअर या प्रमुख मोठ्या चार रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, दवाखान्यांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतात. मात्र, कॅन्सरसारख्य घातक आजारावर उपचाराची सुविधा पालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना कॅन्सरच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात आर्थीक भुर्दंड सहन कारवा लागतो. त्यामुळे पालिकेने स्वतः कॅन्सर केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. हा सल्लागार प्रोटोन थेरपीसाठी तांत्रिक तपशील आणि यंत्रसामग्रीचे तपशील तयार करणे, प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, मुंबईत प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे, पुरवठादार ओळखणे आणि कामकाज वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पर्यवेक्षण करणे अशी कामे करणार आहे. सुमारे तीन एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. एकूण प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च केला जाणार असून सल्लागारासाठी २ कोटी ८० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबाबचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
हेही वाचा - महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवा; पालिकेचे मुंबई विद्यापीठाला पत्र
फक्त कर्करोगाच्याच पेशी नष्ट करणारी 'प्रोटोन थेरपी' -
पालिकेच्या कॅन्सर केअर सेंटरमध्ये गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार आहेत. यामध्ये कमीत कमी डोस देऊन कर्करोगाच्या अधिकाधिक पेशी नष्ट करून, केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणाऱ्या व केवळ ट्युमरला लक्ष्य करणारी रेडिएशन प्रकारातील 'प्रोटोन थेरपी' ही कॅन्सरवरील सर्वात अत्याधुनिक व प्रभावी उपचार पद्धती सुरू केली जाणार आहे.
हे उपचार मिळणार -
- कॉम्पॅक्ट सिंगल रूम प्रोटोन थेरपी सिस्टीम
- एसपीईसीटी गामा कॅमेऱ्यासह पीईटी-सीटी
- एचडीआर ब्रेकीथेरपीसह एलआयएनआयएसी
- १.५ टी एमआरआय, १२८ स्लाईस सीटी
- मॅमोग्राफी, सोनोग्राफी
- डेटा अनालिसीस सेंटरसह केमोथेरपी