मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा शेवटचा दिवस ( BMC Last Day ) व शेवटची स्थायी समिती भाजपा आणि शिवसेनेच्या घोषणाबाजीत चांगलीच गाजली. ( BMC term ends today ) हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्याने भाजपा नगरसेवकांनी स्थायी समितीत तसेच पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात तर शिवसनेच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.
भाजप-शिवसेना नगरसेवकांची घोषणाबाजी -
मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ आज संपत आहे. उद्यापासून पालिकेवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. ( Administrator on BMC ) या पार्श्वभूमीवर आज महापालिकेची स्थायी समितीची शेवटची सभा आयोजित केली होती. या सभेत सहा हजार कोटींचे तब्बल ३७० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. सभा सुरू होताच भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी कामकाजावर हरकतीचा मुद्दा घेण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केली. यशवंत जाधव यांनी कामकाज संपल्यावर हरकतीचा मुद्दा घ्या, असे शिंदे यांना सांगितले. हरकतीचा मुद्दा घेण्यास दिला नाही म्हणून भाजपा सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपकडून यशवंत जाधव हाय हाय, चेअरमन हाय हाय, अब तो ये स्पष्ट है चेअरमन भ्रष्ट है, आपण तिघे भाऊ भाऊ, महापालिका वाटून खाऊ अशा घोषणाबाजी केली. तर त्या प्रत्त्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रभाकर शिंदे हाय हाय, प्रभाकर शिंदे भ्रष्ट है, कोण है कोण है बीजेपी ईडी की दलाल है, गली गली मे शोर है बीजेपी चोर है, अशी घोषणा बाजी केली. घोषणाबाजी दरम्यान भाजपा सदस्य कमलेश यादव व ज्योती आळवणी, राजश्री शिरवाडकर यांनी प्रस्ताव फाडून सभागृहात भिरकावले. भाजपा सदस्य मकरंद नार्वेकर यांना सभागृहातील व्हिडिओ बनवण्यापासून शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी रोखले. स्थायी समिती सभागृहात शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असतानाच स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांनी अर्ध्या तासात सुमारे ३०० प्रस्ताव मंजूर केले.
भाजपचे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन -
स्थायी समितीमध्ये घोषणाबाजी नंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. यावेळी समिती अध्यक्षांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आजच्या बैठकीत आम्हाला हरकतीचा मुद्दा मांडू दिला नाही. ६ हजार कोटींचे प्रस्ताव आज अर्ध्या तासात मंजूर करण्यात आले. कोणतीही पाहणी न करता ३ अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन प्रस्ताव आणले गेले, हा पैसा करदात्या मुंबईकरांचा आहे.
हेही वाचा - Amendment Bill Passed : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
तो शिवसेनेच्या खिशात जाऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनी आज मंजूर झालेले सर्व प्रस्ताव चौकशी करून रद्द करावे, अशी मागणी घेऊन आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करत आहोत, असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर धाडी पडल्या आहेत, त्यात कंत्राटदारांचा पैसा त्यांना मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे हे प्रस्ताव आयुक्तांनी रद्द करावेत, अशी आमची मागणी असल्याचे शिंदे म्हणाले. भाजपाने पालिका आयुक्तांनी आंदोलन केले. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे तक्रारींचे निवेदेन दिले.
शिवसेना पारदर्शक -
भाजपाने आमच्यासोबत गेले २५ वर्षे काम केले आहे. त्यांना शिवसेना किती पारदर्शकपणे काम करते हे माहीत आहे. त्यांनी आज काही भाष्य केले असेल ते वैफल्यग्रस्त झाल्याने केले असेल. त्यांच्या भाष्याशी मी कधीही सहमत होणार नाही. स्थायी समिती वैधानिक समिती आहे. हरकतीचे मुद्दे केव्हा द्यायचे हा माझा अधिकार आहे. आजच्या बैठकीत जास्त संख्येने प्रस्ताव होते. मागच्या बैठकीतील प्रस्तावही मोठ्या प्रमाणात होते. त्यावर चर्चा करून मंजूर करणे महत्वाचे होते. त्यामुळे त्यांना नंतर हरकतीचा मुद्दा घ्या, असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी आरडाओरड केली, यामध्ये त्यांचा हरकतीचा राहून गेला, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती यशवंत जाधव यांनी दिली आहे.