मुंबई - कोरोनामुळे चिकन म्हणजेच कोंबडीचे मांस खाणे योग्य नाही, असे संदेश सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. हे संदेश अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका. ‘नोव्हल कोरोना’ विषाणूचा कुक्कुटपालन व त्याच्या उत्पादनाशी काहीही संबध नसल्याने चिकन आणि अंडी पूर्णत: सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील खोट्या संदेशांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे. २०१९च्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण ७ कोटी ४२ लाख इतकी कोंबड्यांची संख्या आहे. ‘नोव्हल कोरोना विषाणू’ प्रार्दुभवाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चिकन आणि इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरवल्या जात आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावे. याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा व रोग अन्वेषण विभाग यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेला याबाबत एक परिपत्रकही मिळाले आहे.
राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायाशी लाखो शेतकऱ्यांचा चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कुट पालन उद्योगाशी संलग्न आहेत. मात्र, कोरोना आल्यापासून विविध अफवांमुळे या व्यवसायावर अनिश्चततेचे संकट आहे. कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादेने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये ‘कोरोना विषाणू’ संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून व शिजवून खाल्ले जाते. त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता चिकन व अंडी यांचे सेवन करावे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.