मुंबई - महानगरपालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. चीनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी पालिका ७९ हजार खर्च करणार आहे. त्यापैकी ३०० कॉन्सन्ट्रेटर पालिकेने उत्पादकाकडून न घेता पुरवठादाराकडून घेतले आहे. यामुळे पालिकेचे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आरोप केला आहे.
जास्त दर देऊन खरेदी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करून पालिकेने प्रती मिनिट दहा लिटर क्षमतेचे १२०० काॅन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला १० कोटी ४२ लाख रुपये मोजणार आहे. वितरकाने पहिल्या टप्प्यात ३०० काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा पालिकेला केला आहे. जे काॅन्सन्ट्रेटर बाजारात ५४ हजाराला मिळतात तेच काॅन्सन्ट्रेटर पालिकेने ७९ हजार रुपयांना विकत घेतले आहे. या व्यवहारात पालिकेचे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे रवी राजा म्हणाले. पालिकेने उत्पादन करणाऱ्या कंपन्यासोबत करार केला असता तर कमी किमतीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले असते तसेच पालिकेचे १ कोटी २० लाख रुपये वाचले असते रवी राजा यांनी सांगितले.
नागरिकांसाठी खरेदी -
दरम्यान, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी कमी दरात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मिळत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे योग्य असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. नागरिकांना व रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी काॅन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
बाजारभावापेक्षा महाग -
मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी केली जात आहे. १२०० पैकी ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठादाराने पालिका प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा - अंगावर याल तर शिंगावर घेऊच; महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाजपला इशारा