मुंबई : कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक आज बीएमसी कार्यालयात झाडाझडती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेच्या 12 हजार 024 कोटी रुपयांच्या कामांची कॅगकडून चौकशी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. या कथित घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निश्चित मिश्रा आणि पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार हे पथकासह महापालिकेच्या मुख्यालयात पोचले होते. त्यांनी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात केली. आज देखील हे पथक पुन्हा महापालिकेत जाऊन कागदपत्रे ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ गुप्ता विशेष तपास पथकाच्या रडारवर : महापालिकेतील कथित घोटाळा प्रकरणात डॉ. गुप्ता यांचे देखील नाव समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या रडारवर डॉ. गुप्ता हे असून त्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने EOW विशेष तपास पथक नेमून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आता आम्ही पुढील तपास करण्यासाठी कागदपत्रे गोळा करत आहोत. कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार आढळल्यास पुढील कारवाई करू. या प्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथक सोमवारी बीएमसी कार्यालयात पोहोचले. त्यांनी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी कागदपत्रे घेतली ताब्यात : कथित घोटाळा झाला, त्यावेळी कोणता अधिकारी तेथे तैनात होता. त्या अधिकाऱ्याने कोणत्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली, याचा तपास केला जाईल. याबाबत सर्व अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात येणार आहेत. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बीएमसीत जाऊन संबंधित विभागांकडून कागदपत्रे घेतली आहेत. मंगळवारीही अधिकारी बीएमसीमध्ये जाऊन संबंधित इतर कागदपत्रे घेऊन येतील, असेही या पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
१२ हजार २४ कोटी रुपयांचा कथित घोटाळा : मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या १२ हजार २४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथ स्थापन केले आहे. या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केले आहे. प्राथमिक चौकशी म्हणजे नियमित चौकशी सुरू करण्यापूर्वी कोणत्याही तक्रारी किंवा अहवालाच्या तपासाच्या स्वरूपाची तथ्य शोधणारी चौकशी केली जाते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना : कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली. या तपास पथकाचे प्रमुख शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर असून आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि एक सहायक पोलीस आयुक्त सदस्य आहेत. पहिली प्राथमिक चौकशी ( प्रिलीमनरी इंक्वायरीज) दहिसर एकसर भूसंपादनातील कथित 206 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आहे. दुसरी प्राथमिक चौकशी माहिती तंत्रज्ञान, रस्ते आणि वाहतूक विभागातील 200 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. तर तिसरी प्राथमिक चौकशी रस्ते विभाग आणि नागरी संस्थेच्या पाच संबंधित विभागांमधील 5 हजार कोटी रुपयांच्या 60 हून अधिक कामांशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.