मुंबई - आरपीआयचे उपाध्यक्ष आणि कुख्यात डॉन छोटा राजन यांचे बंधू दीपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, अचानक त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. याबाबत आपण फलटणमधून नाही, तर चेंबूरमधून उमेदवारी मागितली होती, असा खुलासा निकाळजेंनी केला आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीने आरपीआयला एकही जागा सोडली नाही. यामुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युतीवर नाराज आहेत, असे दीपक निकाळजे म्हणाले.
हेही वाचा - दिग्गजांच्या तिकीट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आरपीआय आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांच्यात युतीची बोलणी झाली होती. त्यावेळी आरपीआय आठवले गटासाठी काही जागा सोडल्या जातील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र भाजप-शिवसेनेने जागा सोडल्या नाहीत.
चेंबूर हा माझा परंपरागत मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे चेंबूर मतदारसंघ मला सुरक्षित होता. आता आरपीआय-भाजप-शिवसेना युती असल्याने चेंबूरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात
मानखुर्द शिवाजीनगरमधून आरपीआयचे मुंबई जिल्हा अध्यक्ष गौतम सोनवणे यांचे नाव जवळपास निश्चित होते. त्याप्रमाणे सोनवणे यांनी मतदारसंघात कामही सुरू केले, पण ऐनवेळी शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना एबी फॉर्म देण्यात आला, अशी माहिती दीपक निकाळजे यांनी दिली.