मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज भाजपच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचे उद्घाटनही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केले.
अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेवर जोरदार टीका केली.
देशाच्या सर्वाधिक कोरोना केसेस मुंबईत आणि महाराष्ट्रात का?
मुंबईतील मृत्यू दर कोरोनामूळे वाढला होता. महाराष्ट्रासारखी भीषण अवस्था दुसऱ्या राज्यात पाहिली नाही. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. कोरोनामुळे नुकसान झालेल्यांना पॅकेज जाहीर केले नाही.
सवलत देऊ, हजार कोटी देऊ, असे म्हणाले होते. मग ते कुठे आहे? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. केंद्र सरकारने 9000 कोटी देऊ केलेले ते घेतले नाही. एक पैशाची मदत देखील केली नाही नुसत्या बदल्या करण्यात हे सरकार व्यस्त होते. एंजटसारखेच काम करत होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली.
हे सरकार विश्वासघातकी-
महाविकास आघाडीसरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. जो गरिबांकरता काम करतो त्यांच्या पाठी लोक उभी राहतात. मागच्या पाच वर्षात अनेक अडकलेली काम मार्गी लावली आहे. कोस्टल रोड तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. रो रो सेवा सुरू केली. बीडीडी चाळ प्रकल्प सुरू केला. सरकार एलअँडएनटी कंपनीला मदत करायला तयार नाही. धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला. मेट्रोच मोठे नेटवर्क उभे केले. मात्र हे सरकार विश्वासघातकी असल्याची टीका फडणवीसांनी केली.
इच्छा असेल तिथे मार्ग आणि टाईमपास करायचा असेल कांजूरमार्ग
मेट्रोवरूनही यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मेट्रो कारशेडसाठी समिती तयार केली होती. त्या समितीने हेच सांगितले की मेट्रो तयार होण्यासाठी खूप वेळ लागेल. तरी त्यांनी हा रिपोर्ट त्यांनी दाबून ठेवला. खाजगी विकासकाने या जागेवर देखील दावा केला आहे. यापूर्वी या सरकारने लोकांचा पैसा पाया घालवला आहे. मुंबईच्या खाड्या कोणाच्या कार्यकाळात बुजल्या गेल्या आहेत. हे सरकार जनेतची दिशाभूल करत आहे
पहिल्या दिवसापासून त्यांनी मेट्रोला विरोध केला आहे. जनतेला मेट्रो आणि बुलेट ट्रेन हवी असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी या बैठकीत केला आहे.
कार्यकर्त्यांनो तयार रहा-
बेकायदेशीर पोलीस कारवाई करणाऱ्यानी लक्षात ठेवा की सरकार बदलत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई देखील सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली आहे. भारतीय जनता पक्ष दोन हात करायला तयार आहे. राक्षचाचा जीव पोपटामध्ये तसा काहींचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकला आहे. मात्र आता महानगरपालिकेची सत्ता बदलणार आहे. मागच्या वेळीच मुंबई महानगरपालिकेत सत्ता बदलली असती, पण आम्ही दोस्ती निभावली. सत्तेचा माज यांच्या डोक्यात गेला आहे. मुंबई महानगरपालिकेची भाजपची नवीन टीम ही लोकांपर्यत पोहोचेल. त्यासाठी त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहनही केले आहे.
यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत तुम्ही नुसते बोलता, हिंदुत्व तुमच्या कृतीत दिसत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगवला आहे.