मुंबई - महा विकास आघाडी सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, शेतकरी कर्जमाफी, यासह विविध मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. आज पहिल्याच दिवशी भाजप सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणा देऊन भाजपने आक्रमक होणार असल्याचा चुणूक दाखवली.
अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी लागणार आहे. कारण, अनेक मुद्द्यापरून भाजप ठाकरे सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. तीन पक्षाचे सरकार असलेल्या सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कर्जमाफीच्या त्रुटीवरून पहिल्याच दिवशी भाजपने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधी भाजप सदस्यांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला होता.
सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. अतिवृष्टी शेतकरी वंचित आहे. कर्जमाफी मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. आम्ही सभागृहात या सोबत आवाज उठवू. राज्यातील महिला देखील असुरक्षित आहेत आणि सरकार असंवेदनशील आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - ठाकरे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून