मुंबई- मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली असताना आता त्यात शिवसेना आमदाराची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत फेर प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. माझी सत्ता आहे पण मी सत्तेत नाही, अशी नाराजीची भावना ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला सेनाभवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जाधव यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.
भास्कर जाधव यांनी नाराज नसल्याचे जरी सांगितले तरी त्यांची नाराजी यामुळे लपून राहिलेली नाही. मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते. काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात, असे सांगून मी त्यांचा वेळ मागितला आहे. ते ज्या दिवशी वेळ देतील त्यावेळी मी त्यांच्याशी बोलणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, न मिळाल्याने मला धक्का बसला आहे. माझ्याबाबतची अजून कटूता संपलेली नाही, याला वाव राहतो, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्याला आमदार भास्कर जाधव उपस्थित नव्हते.
हेही वाचा- शालेय पोषण आहाराच्या तांदळात अपहार; आरोपीला मुद्देमालासह विक्रोळीत अटक