मुंबई - मुंबईकरांचा प्रवास 'बेस्ट' होण्यासाठी बेस्टने भाडे कपातीचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे प्रवासी बेस्टकडे वळतील, याचा टॅक्सी युनियनने धसका घेतला आहे. त्यामुळे सध्या टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपये असून टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये करावे, अशी मागणी टॅक्सीमन युनियनने परिवहन विभागाकडे केली आहे, अशी माहिती टॅक्सीमन युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी दिली.
मंगळवारी 25 जूनला परत परिवहन सचिव आशिष सिंग, परिवहन आयुक्त शेखर चन्ने व मुंबई टॅक्सीमन युनियन यांच्यात मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत भाडेवाढ करण्याबाबत तोडगा निघेल, असे क्वाड्रोस यांनी सांगितले. जर टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली तर मुंबईकर प्रवाशांना अगोदरपेक्षा 3 रुपये अधिक मोजावे लागतील.
तर भाडेवाढ करतान 'खटूआ' समितीनुसार भाडेवाढ लागू करावी. तसेच दुपारी 1 ते 4 या वेळेत हॅप्पी अवर्स चालवून कमी भाडे आकारावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
मुंबईत होऊ घातलेला मेट्रो प्रकल्प व आता बेस्टने दरवाढ कपातीचा केलेला निर्णय यामुळे टॅक्सी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तर हॅप्पी अवर्समध्ये कमी भाडे आकारल्यास सीएनजी, मेंटेनन्स आदी तूट कशी भरून निघणार, असा प्रश्न आता टॅक्सी चालकांसमोर आहे. त्यामुळे ग्राहक पंचायतीच्या निर्णयाला टॅक्सीमन युनियनचा विरोध असल्याचे क्वाड्रोस यांनी सांगितले.