मुंबई - उपनगरात रविवारी संध्याकाळी आकाश भरुन आले. आपल्या झोपड्यावर पहिल्या पावसाच्या धारा कोसळून आत येतील आणि घर चिंब होईल म्हणून उपनगरातील विक्रोळी परिसरातील रहिवाशी आपल्या झोपड्यावर फ्लेक्स, प्लास्टिक अंथरवून पहिल्या पावसापासून बचाव करत आहे.
महाराष्ट्रात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र, सर्वांचे डोळे मान्सून कधी येतो आणि या उकाड्यापासून सुटका कधी होते याकडे लागले होते. आता मान्सूनची प्रतीक्षा संपली असून मान्सून केरळ मध्ये शनिवारी सकाळी दाखल झाला आहे. या पुढेही मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. १३ ते १५ जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अनेक दिवसांपासून मुंबईकर पावसाची चातकासारखी वाटपाहात होते. यंदा मुंबईचे तापमान चाळीशी पार गेले होते. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत. आज आकाशात पावसाचे ढग भरून आले असल्याने उपनगरात उकड्यापासून दिलासा मिळाला.
पावसाची चाहूल लागताच विक्रोळी उपनगरातील पार्क साईट, हनुमान नगर, अमृत नगर येथील रहिवाशी आपल्या झोपड्यावरील सिमेंट पत्र्यांची डागडुजी व त्यावर प्लास्टिक कापड व दगड, लाकूड टाकताना दिसले. येणाऱ्या पावसाच्या धारांपासून घराचा बचाव व्हावा यासाठी ही लगबग पहायला मिळाली. आज रविवार असल्याने बरेच चाकरमानी घरीच असतात. त्यामुळे पुरुष झोपडीच्या वर प्लास्टिक टाकत होते, तर त्यांना महिला लहान मुले झोपडी मदत करत असल्याचे पहायला मिळाले.