मुंबई - मुंबईत दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन बारामती अॅग्रो या कंपनीकडून महानगरपालिकेला मदतीचा हात दिला आहे. महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे ४० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द केले. यावेळी मुंबईतील रुग्णांसाठी असे मदतीचे अनेक हात पुढे येण्याची गरज असल्याचे राखी जाधव म्हणाल्या.
महानगरपालिकेच्या कामाची दखल -
मुंबईत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची लाट आली. दिवसाला ७ ते ११ हजार रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. ऑक्सिजन कमी असल्याने पालिकेच्या सहा रुग्णालयातील १६८ रुग्णांना इतर रुग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये हलवावे लागले होते. यानंतर पालिकेने ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या व ऑक्सिजनची कमी पडू दिली नाही. या महानगरपालिकेने केलेल्या कामाची व योग्य उपाययोजनांची दखल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच निती आयोगानेही घेतली आहे.
हेही वाचा - अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला हातोडा..पाहा व्हिडिओ