मुंबई - वेतनवाढ, खासगीकरण आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. तर रविवारीदेखील बँकेला सुटी असल्याने सलग तीन दिवस बँकेचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. बँकांचे होणारे खासगीकरण थांबवले पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे.
हेही वाचा - 'विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले'
अर्थसंकल्पाच्या तोंडावर आंदोलन होऊ नये म्हणून सरकारने वाटाघाटीचे नाटक केले. कर्मचाऱ्यांच्या न्यायक मागण्या त्यांनी मान्य न केल्यामुळे बँक कर्मचारी 48 तासांच्या संपावर जाणार आहेत, असे बँक अभ्यासक विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आजही प्रलंबित असून यामध्ये वेतन पुनर्रचना, समान काम समान वेतन, पेन्शन आढावा, रिक्त जागांची भरती आदी मुद्द्यांचा समावेश आहे. यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पूर्वीही लाक्षणिक संप पुकारला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्षच होत आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यात बहुसंख्य बँक कर्मचारी संघटनांचा समावेश असल्याने संपाच्या काळात बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. आझाद मैदानात मुंबई भागातील बँक कर्मचारी जमणार आहेत. एटीएम हा पर्याय असला तरी एक फेब्रुवारी रोजी 'एटीएम'मध्ये पैशांची चणचण भासण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बनतेय 'डेथ लाईन', २०१९ मध्ये २ हजार ६११ प्रवाशांचा मृत्यू
भारतातील मोठ्या बँक कर्मचारी संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. गेल्या साडे तीन वर्षात 40 वेळा वाटाघाटी झाल्या आहेत. मात्र, सरकार आणि इंडियन बँक असोशिएशन बँक कर्मचाऱ्यांना योग्य ती वेतनवाढ देण्यास तयार नाही. योग्य वेतनवाढ न मिळणे हा त्यांच्या संपाचे मुख्य कारण आहे. हा संप पुकारण्याआधी अनेकदा या सरकारशी प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरल्यामुळे आंदोलन होणार आहे. केंद्र सरकारचे बँक धोरण हे कर्मचाऱ्यांविरोधी आहे. मोठ्या प्रमाणात बँकांचे विलनीकरण होत आहे. 26 राष्ट्रीयकृत बँकांचे 10 बँकांमध्ये विलीनीकरण झाले आहे. 10 हजार बँक शाखा बंद झाल्या आहेत. ठेवीधारकांच्या ठेवी असुरक्षित आहेत, असेही उटगी यांनी सांगितले.