मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत झाली होती, असे वक्तव्य केले. यावर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा इंदिरा गांधी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे ज्येष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी म्हटले आहे. 1960 ते 80 च्या दरम्यान मुंबईत करीम लाला याच्यासह हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचे वर्चस्व होते. यापैकी कोणीही केंद्रातील राजकारण्यांसोबत संपर्क ठेवून नव्हता, असे परमार यांनी म्हटले आहे.
तो फोटो केवळ योगायोग -
इंदिरा गांधी आणि करीम लाला यांचा एक फोटो समोर आला आहे. मात्र, तो फोटो केवळ एक योगायोग असल्याचे बलजीत परमार यांनी सांगितले.
एकेकाळी मुंबईतील काळ्या धंद्यांवर अधिराज्य गाजवणारी ही तिकडी कोण होती? -
कोण होता करीम लाला?
करीम लालाचे खरे नाव अब्दुल करीम शेरखान असे होते. 1911 मध्ये अफगाणिस्तानमध्ये कुनार प्रांतात करीम लालाचा जन्म झाला होता. 1920 च्या दरम्यान तो आपल्या कुटुंबीयांसोबत अफगाणिस्तानमधून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर 1960 ते 1980 चा काळ करीम लालाने गाजवला. सुरुवातीला मुंबईतील डॉकमध्ये काम करणारा करीम लाला काही काळानंतर दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील पठाण टोळीमध्ये सामील झाला. ही टोळी मुंबईतील गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांनी इतरांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी काम करत होती.
हेही वाचा - जम्मू-काश्मीर : आणखी पाच नेते कैदेतून मुक्त, ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केली होती अटक
काही काळानंतर करीम लाला हा स्वतः पठाण टोळीचा म्होरक्या झाला. या टोळीने स्मगलिंग, अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, जुगाराचे अड्डे चालवणे आणि बळजबरी संपत्तीवर कब्जा करणे, यासारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली. साठच्या दशकात मुंबईत पठाण टोळीचा मोठा दबदबा होता. मात्र, 70 च्या दशकात करीम लाला याला प्रतिस्पर्धी म्हणून हाजी मस्तान आणि वरदराजन हे उतरले. तिघांनी बोलणी करून धंदा करण्यासाठी मुंबईचे तीन हिस्से करून घेतले.
नंतर वाढत्या वयामुळे करीम लालाने पठाण टोळीची कमान पुतण्या समद खान याच्याकडे सोपवली. त्यानंतर त्याने हॉटेल व्यवसायासह, ट्रान्सपोर्ट आणि पासपोर्टच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. करीम लाला आठवड्यातून एकदा स्वतःचा जनता दरबार भरवत असे. त्या ठिकाणी तो गरजूंना पैशांची मदत करत असे. काही प्रकरणात तो त्याच्या टोळीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करत होता. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांसह काही राजकारणीही करीम लालाच्या संपर्कात होते. मात्र, त्याची उघड चर्चा तो कधीही करत नव्हता, असे बलजीत परमार यांनी सांगितले. 19 फेब्रुवारी 2002 ला लालाचा मुंबईत मृत्यू झाला. अमिताभ बच्चन यांच्या जंजिर या चित्रपटातील अभिनेता प्राण यांनी केलेली 'शेरखान' ही भूमिका करीम लालावर आधारित होती.
हाजी मस्तान -
मुंबईमध्ये 1960 ते 80 च्या काळामध्ये हाजी मस्तान हा सुद्धा नावाजलेला माफिया म्हणून ओळखला जात होता. मूळचा तामिळनाडूचा असलेला हाजी मस्तान यांचा जन्म 1926 ला झाला होता. मात्र, त्याने कुटुंबीयांसोबत आपले बस्तान मुंबईतील भेंडी बाजार येथे बसवले होते. मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनारी सर्वात मोठे तस्करीचे जाळे चालवण्यासाठी हाजी मस्तान ओळखला जात होता. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मिती आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मस्तान हा पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासोबत नेहमी चांगले संबंध ठेवून होता, असेही परमार यांनी सांगितले. त्याने आपले प्रतिस्पर्धी करीम लाला आणि वरदराजन यांच्यासोबतही त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले. आणीबाणीच्या काळामध्ये हाजी मस्तानला तुरुंगात पाठवण्यात आले. तत्कालीन नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रभावित होऊन हाजी मस्तानने हिंदी शिकण्यास सुरुवात केली होती, असे सांगितले जाते. तुरुंगातून सुटल्यानंतर 1980च्या दशकामध्ये हाजी मस्तान याने राजकारणात प्रवेश करून स्वतःचा 'दलित मुस्लीम सुरक्षा महासंघ' पक्ष काढला. पुढे याचे नाव 'भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ' असे करण्यात आले. 25 जून 1994 ला हाजी मस्तानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वरदराजन मुदलियार -
मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वरदराजन मुदलियार हा हमाल म्हणून काम करत होता. तामिळनाडू येथील मद्रास(चेन्नई)मधील तुतिकोरिन येथे 1926 ला वरदराजनचा जन्म झाला होता. अंडरवर्ल्डमध्ये मोठे होण्यासाठी वरदराजन हा बिस्मिल्ला शहा बाबा दर्ग्यावर नेहमी गरिबांना अन्नाचे वाटप करत होता. मुंबईतील माटुंगा परिसर हा वरदराजनचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1980 च्या काळात वरदराजनच्या टोळीतील शेकडो जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, तर काही जणांचे एन्काऊंटर करण्यात आले. वरदराजन याने जुगाराचे अड्डे आणि अनधिकृत दारूचे अड्डे चालवून स्वतःचे बस्तान बसवले होते. यासाठी हाजी मस्तानने त्याला मोठी मदत केली. नंतर मात्र पोलिसांच्या करवाईला कंटाळून त्याने मुंबई सोडून गाव गाठले होते. तेथेच 2 जानेवारी 1988 ला वरदराजनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, आपला अंत्यविधी मुंबईतच व्हावा अशी, वरदराजनची ईच्छा होती. यासाठी स्वतः हाजी मस्तान याने चार्टर्ड विमानाने त्याचे शव मुंबईतील माटुंगा येथे आणून त्यावर अंत्यविधी केला, असेही परमार यांनी सांगितले.