रायपुर : आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे कायम अडचणीत आणि तितकेच चर्चेत असलेले बागेश्वर बाबा आता नव्याने बरळले आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आपले आकलीचे तारे तोडले आहेत. बागेश्वर बाबा म्हणतात, तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. आणि त्यामुळे त्यांनी देवदेव करण्याचा निर्णय घेतला. या बाबाच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी नव्या वादाला तोंड फोडल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, आता वारकरी सांप्रदायही आक्रम भूमिका घेण्याची शक्यता आहे.
बागेश्वर बाबा काय म्हणाले? : संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारले, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अरे, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय अशी मुक्ताफळे या बाबाने उधळली आहेत.
माफी मागा : या वक्तव्यानंतर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. असे वक्तव्य त्यांनी करू नयेत. आम्ही या बाबांच्या या विधानाचा जोरदार विरोध करत असून त्यांचा आम्ही निषेध नोंदवतो असही ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच, यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणीही तुषार भोसले यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या : यावर सगळीकडून प्रतक्रिया येत असून खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी तुकाराम महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले असेल तर ते दाखवणे बंद करा. मीही अध्यात्माला मानते. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल कोणी काही बोलले असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे असही सुळे यावेली म्हणाल्या आहेत. हे सतत दाखवू नका असे म्हणताना संत तुकाराम महाराजांबद्दल बोललेले खपवून घेतले जाणार नाही असही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
'शिंदेशाही पगडी' पगडीवरूनही वाद : धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिग्रेडनेही समाचार घेतला आहे. यावर संभाजी ब्रिग्रेडचे नेते संतोष शिंदे म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची बदनामी करणारा बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबा, तु पहिली शिंदेशाही पगडी काढ, तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्यांची पगडी आहे. शिंदेशाही, होळकर शाही'ची पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय? असा प्रश्न देखील संतोष शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : भोंदू बागेश्वरधाम 'शिंदेशाही पगडी' काढा...; संभाजी ब्रिगेड आक्रमक