मुंबई: दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हात बाहेर जाणे तसेच उघड्यावर काम करणे टाळा. तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या. हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री, टोपी, शूज किंवा चप्पल वापरा. प्रवासात पाणी सोबत ठेवा. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका. तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा आणि तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हाता पायावर ओलसर कापड वापरा.
पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा. ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये वापरा जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात. जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या. तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
उष्माघातामुळे बाधित व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा. वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी करा. व्यक्तिला 'ओआरएस' लिंबू सरबत प्यायला द्या. शरीराला 'रीहायड्रेट' करण्यासाठी उपयुक्त आहे. त्या व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.