मुंबई : कोरोना लसीकरण मोहिमेतील सर्वात म्हत्त्वाच्या टप्प्याला अर्थात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेच्या निर्देशानुसार एच पूर्व विभागाने आपल्या 10 प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी 10 जागा निश्चित केल्या असून आता तिथे सुसज्ज लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तर प्रशिक्षित डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, इतर मनुष्यबळ आणि साधन सामग्री उभी करत लवकरच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. यशस्वीपणे लसीकरण मोहीम पूर्ण करत कोरोनामुक्तीकडे मार्गक्रमण करू, असा विश्वास एच पूर्व विभाग सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी व्यक्त केला आहे.
एच पूर्व विभागात वांद्रे (पूर्व), खार (पूर्व) आणि सांताक्रूझ (पूर्व) असा परिसर आहे. तर यात पालिकेचे 87 ते 96 असे 10 प्रभाग आहेत. एकूण लोकसंख्या 6 लाख आहे. तेव्हा या 6 लाख लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे आव्हान एच पूर्व विभागासमोर आहे. त्यानुसार बीकेसी कोविड सेंटर आणि व्ही. एन. देसाई रुग्णालय या दोन सरकारी लसीकरण केंद्रासह खासगी केंद्रात लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत 1 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता लोकसंख्येतील सर्वात मोठा गट असलेल्या 18 ते 44 या गटाचे लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी आम्ही पालिकेच्या निर्देशानुसार 10 स्वतंत्र लसीकरण केंद्रे उभारत आहोत. यासाठी जागा निश्चित केली आहे. तिथे केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे ससाणे यांनी सांगितले आहे.
2000 चौरस फूट जागेत असणार केंद्र
एच पूर्व विभागात 10 प्रभाग असून या प्रभागातील नगरसेवकांच्या मदतीने जागा निश्चित केल्या आहेत. किमान 2000 चौरस फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या अशा या जागा आहेत. या जागा एखाद्या खासगी नर्सिंग होम्सच्या जवळ आहेत. तर लसीकरणानंतर एखाद्या लाभार्थ्यांला कोणताही त्रास होणार नाही. त्याच्यावर तत्काळ उपचार करता यावेत या उद्देशाने या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या नर्सिंग होम्सशी पालिका यासाठी करार करणार असल्याचेही ससाणे यांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रत्येक केंद्रात 1 डॉक्टर, 2 नर्स, वॉर्डबॉय आणि इतर आवश्यक कर्मचारी वर्ग असणार आहे. लस दिल्यानंतर किमान 30 मिनिटे लाभार्थ्यांचे मॉनिटरिंग करावे लागते. त्यासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
दिवसाला 200 ते 600 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
18 ते 44 वयोगटातील लसीकरणाच्या टप्प्याची संपूर्ण जबाबदारी त्या त्या विभागावर टाकण्यात आली आहे. त्यानुसार 10 केंद्रे एच पूर्व विभागाकडून उभारली जात आहेत. येत्या तीन-चार दिवसात केंद्राचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जसे पालिकेचे निर्देश येतील आणि लसीचे डोस उपलब्ध होतील, तसे प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल, असेही ससाणे यांनी स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने आहेत. तर या विभागात 6 लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. आतापर्यंत 1 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तेव्हा आता 18 ते 44 आणि 45 च्या पुढचे अशा सगळ्यांचे लसीकरण शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याचा या विभागाचा मानस आहे. त्यासाठीच 18 ते 44 गटातील लसीकरणाचा वेग वाढता राहावा यादृष्टीने या टप्प्यातील लसीकरण होणार आहे. त्यामुळेच दिवसाला प्रत्येक केंद्रावर कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 600 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट या विभागाने ठेवले आहे.
लसीकरणासाठी जनजागृती, नगरसेवकांचाही सहभाग
मोठ्या संख्येने हा वयोगट लसीकरणासाठी पुढे यावा, यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. तर मतदार यादीची पडताळणी करत या वयोगटातील नागरिकांशी संपर्क साधत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे नगरसेवकही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तेही नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृती व इतर कामासाठी मदत करणार आहेत.
लसीकरणासाठी येण्यासाठी वाहनांची सोय
नागरिकांना केंद्रावर येणे सोपे व्हावे, यासाठी वाहनांचीही सोय करण्यात येणार आहे. एकूणच 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचा टप्पा राबविण्यासाठी एच पूर्व विभाग आता जोरात तयारीला लागला आहे, असे ससाणे यांनी सांगितले.
ही आहेत एच पूर्व विभागातील 10 लसीकरण केंद्रं
* प्रभाग क्रमांक-केंद्र
1) 87- राजे संभाजी विद्यालय
2) 88- संत निरंकारी भवन
3) 89- पाठक कॉलेज
4) 90- नाइस कम्युनिटी
5) 91- वांद्रे हिंदू असोसिएशन वेल्फेअर सेंटर, पोलीस ट्रेनिंग सेंटर
6) 92- विंडसोर लेन
7) 93- पीडब्ल्यूडी कम्युनिटी हॉल
8) 94- शिवालिक व्हेंचर ऑफिस
9) 95- सद्गुरु रहिवासी हितवर्धक चाळ
10) 96- शिवाजी कॉलनी हॉल