मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात सत्ताधारी पक्षातच मतमतांतरे दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सीबीआय चौकशीला हरकत नसल्याचे म्हटले आहे.
भाजपा नेत्यांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, राज्याच्या गृहविभागाने सर्वोच्च न्यायालयात अद्याप तशी भूमिका घेतलेली नाही. एकीकडे बिहार पोलीसही या प्रकरणाचा तपास करत असून मुंबई पोलीस याबाबत सहकार्य करत नसल्याची तक्रार बिहार पोलिसांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केली आहे. आता प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा नेत्यांनी या प्रकरणाच्या तपासावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सेनेचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांची या प्रकरणात संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केल्यास आतापर्यंत उघड न झालेल्या बाबीसमोर येतील, असे भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी म्हटले आहे.